वाशिम, दि. 01 : विभागीय आयुक्त पीयूष सिंह हे आज 1 ऑक्टोबर रोजी विविध विषयावरील आढावा बैठकीसाठी वाशिम येथे आले असता, त्यांनी वाशिम तालुक्यातील पारडी/टकमोर शिवारातील रामराव चौधरी या शेतकऱ्याच्या शेतीला भेट दिली. 28 व 29 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने चौधरी यांच्या सोयाबीन व तूर पिकाच्या नुकसानीची पाहणी करुन सिंह यांनी चौधरी यांचेशी संवाद साधला.
आपण पीक विमा काढला असून, पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नसल्याचे चौधरी यांनी सांगितले. सिंह यांनी पीक नुकसानीबाबतचा अर्ज कृषी विभागाकडे तसेच विमा कंपनीकडे करण्याचे चौधरी यांना सांगितले.
पीक नुकसानीची पाहणी करतांना आयुक्त सिंह यांच्यासोबत जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ, मंडळ कृषी अधिकारी मापारी, तलाठी किसन महल्ले, कृषी सहायक डी.एल. मासाळ व संतोष चौधरी उपस्थित होते.






