वाशिम, दि. 30 : जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या पाच दिवसाचा कालावधीत ग्रामीण भागातील ज्या गावाचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्या 100 गावांची लसीकरणासाठी निवड या मोहिमेअंतर्गत करण्यात आली आहे. या गावांमधील कोणताही पात्र लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये. यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षण, कृषि, उमेद, अंगणवाडी, ग्रामपंचायत, महसूल, आरोग्य तसेच माविम कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करुन लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील त्या 100 गावात लसीकरणासाठी विशेषत: महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. लसीकरण केंद्रांवर पात्र लाभार्थ्यांनी सुरक्षीत अंतर ठेवून लस घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सायंकाळी 6 वाजतापर्यंत जवळपास 10 हजार 441 पात्र व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. लसीकरणाची धडक मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने तालुकानिहाय पर्यवेक्षणासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे.
ग्रामीण भागातील सर्व घटकांचे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करणे या लसीकरण मोहिमेमुळे शक्य होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, सुनील निकम यांनी दिली.






