प्राध्यापकाच्या पत्नीची तब्बल ४४ लाखाने फसवणूक

0
11

यवतमाल दिनांक 19 जून ( प्रतिनिधी)

डोळे तपासणी यंत्र विक्रीची ‘फ्रेंचायजी’ देण्याचे आमिष दाखवून हरियाणातील ठगांनी येथील एका प्राध्यापकाच्या पत्नीची तब्बल ४४ लाखाने फसवणूक केली. याप्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात हरियाणातील पुलकीत कपूर याच्यासह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शहरातील दर्डा नगर परिसरात राहणाऱ्या प्रतिमा इंगळे यांची १३ मे ते १५ जून २०२२ दरम्यान फसवणूक करण्यात आली. इंगळे यांचे बँक ऑफ इंडियात खाते आहे. त्यांचे पती प्रवीण इंगळे समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून ४३ लाखांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम त्यांनी प्रतिमा यांच्या खात्यात वळती केली.

प्रतिमा यांनी ‘गुगल ॲप’वरून लेन्स कार्ट सोल्यूशन प्रा.लि. फरिदाबाद या कंपनीच्या फ्रेंचायजीबाबत सर्च केले. त्यानंतर १३ मे २०२२ रोजी इंगळे यांनी ऑनलाईन अर्ज केला. इंगळे यांच्या व्हॉट्सॲपवर पुलकीत कपूर यांचे नाव आणि मोबाइल क्रमांक पाठविण्यात आला. १७ मे रोजी कपूर यांनी ‘कन्फर्मेशन लेटर’ पाठविले आणि पैसे पाठविण्यास सांगितले.

इंगळे यांनी ‘मोबाईल युपीआय’वरून ५५ हजार ८०० रूपये आणि पती प्रवीण यांच्या मोबाईलवरून ९० हजार पाठविले. त्यानंतर १८ मे रोजी २ लाख ३६ हजार आणि २ जूनला पाच लाख पाठविले. यानंतरही कपूर याने प्रतिमा इंगळे यांना वारंवार पैशाची मागणी केली. त्यानुसार, इंगळे यांनी १५ जूनपर्यंत एकूण ४४ लाख, १ हजार, ८०० रुपये कपूर यांनी दिलेल्या वेगवेगळ्या खात्यात वळते केले.

दरम्यान, १५ जून रोजी प्रतिमा यांनी कपूर यांना वारंवार फोन केले मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून कपूर याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास अवधुतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here