शिवसैनिकांनो आपण घरी जा तिकडे येण्याची हिंमत कोणी करणार नाही: मुख्यमंत्री ठाकरे

0
9

महाराष्ट्र दिनांक 22 एप्रिल (प्रतिनिधी)

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत येऊन पोहोचले आहेत. कितीही धमक्या द्या, कारवाई करा पण आम्ही उद्या सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसेचं पठण करणारच, असा पवित्रा राणा दाम्पत्यांनी व्यक्त केला.

मुंबईत दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. राणा दाम्पत्याच्या ठाम निर्धारानंतर शिवसैनिक देखील कमालीचे आक्रमक झाले आहेत.

राणांच्या पत्रकार परिषदेनंतर हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर जमायला सुरुवात केली. ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेनेचा विजय असो’, अशा घोषणांनी मातोश्रीचा परिसर दणाणून गेला. दरम्यान ५ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वर्षा’वरुन ‘मातोश्री’कडे जायला निघाले. ‘मातोश्री’ बंगल्याच्या परिसरात येताच त्यांनी जमलेल्या हजारो शिवसैनिकांना हात उंचावून अभिवादन केलं.

संध्याकाळी ७ वाजता मातोश्रीवर सेना नेत्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा बंगल्याच्या बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांचे आभार व्यक्त करताना, ‘तुम्ही सकाळपासून इथे जमलेला आहात. आता आपण घरी जावं. इकडे येण्याची कुणी हिम्मत करणार नाही’, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राणा दाम्पत्याच्या आक्रमक पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या शासकिय निवासस्थानावरुन मातोश्रीकडे निघाले. तिथे मातोश्री परिसरात हजारो शिवसैनिक जमले होते. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवून हात उंचावून शिवसैनिकांना नमस्कार केला. तिथून ते मातोश्रीवर महत्त्वाच्या बैठकीसाठी गेले.

राणा दाम्पत्याच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना नेते अनिल परब, खासदार अनिल देसाई, नेते वरुण सरदेसाई यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उद्या राणांना कसं रोखायचं, कोणत्या पदाधिकाऱ्याकडे काय जबाबदारी द्यायची, याविषयी चर्चा झाली.

तासाभराच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर आले. सकाळपासून मातोश्रीबाहेर गर्दी केलेल्या शिवसैनिकांचे त्यांनी आभार मानले. आपण आता घरी जावं. या परिसरात येण्याची कुणी हिम्मत करणार नाही, असं मुख्यमंत्री शिवसैनिकांना म्हणाले. मात्र राणांविरोधात आम्ही रात्र जागून काढू, असा निर्धार काही महिला पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here