ऑक्सिजन निर्मितीची चाचपणी करण्यासाठी राज्य शासनाच्या चमुची उत्तम गलवाला भेट

0
19

#वर्धा दि 17 :- झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या आणि गंभीर परिस्थितीत लागणारा कृत्रिम प्राणवायू याची भविष्यातील गरज लक्षात घेता ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून उत्तम गलवा येथील आयनॉक्स या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून जिल्ह्यासाठी किती ऑक्सिजन मिळू शकतो याची व्यवहार्यता तपासण्यासाठी आज जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या चमूने उत्तम गलवा येथील ऑक्सिजन प्रकल्पाला भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, उत्तम गलवा चे अध्यक्ष बिरेंद्रजी, मुख्य कार्यकारी अधिकारी बिजॉय कुमार, मानव संसाधन सहाय्यक महाव्यवस्थापक प्रशांत जावदंड आदी उपस्थित होते.

सध्या जिल्ह्यात सुमारे 15 हजार क्युबीक मीटर ऑक्सिजनची गरज आहे.भविष्यात 5 मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागलयास एवढी मोठी गरज भागविण्यासाठी पूर्व तयारी म्हणून सद्यस्थितीत असलेल्या औद्योगिक प्रकल्पाला लागणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भागवली जाऊ शकते का? याची तयारी राज्य शासन करीत आहे.

जिल्ह्यात उत्तम गलवा या स्टील प्रकल्पासाठी कंपनीने आयनॉक्स कंपनीचा 264 मेट्रिक टन क्षमतेचा प्राणवायू पुरवठा प्रकल्प उभारला आहे. जिल्ह्यात भविष्यातील रुग्णांना लागणाऱ्या प्राणवायूची गरज बघता उत्तम गलवा यांच्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून वैद्यकीय गरजेसाठी प्राणवायू विलगिकरण करता येऊ शकते का? याची चाचपणी आज भेट दिलेल्या चमूने केली. औद्योगिक प्रकल्पासाठी निर्मिती होणाऱ्या प्राणवायू प्रकल्पातून वैद्यकीय गरजेसाठी लिक्विड प्राणवायू निर्मिती करण्यासाठी कोणत्या तांत्रिक बाबी लागू शकतात? त्यावर उपाय योजना करण्यासाठी कोणत्या बाबीची गरज आहे, तसेच निर्मितीनंतर प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी बॉटलींग युनिट आदीं बाबींची पडताळणी त्यांनी केली.

उत्तम गलवा येथील प्रकल्पातून कोरोना रुग्णांसाठी प्राणवायू उपलब्ध झाल्यास वर्धा जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागून इतर जिल्ह्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो असे डॉ शिंदे यावेळी म्हणाले.

 

#wardhafightscorona #wardha_district #Wardha #Corona_Update #CoronavirusPandemic #Corona_Update #oxygen #oxygencylinder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here