नागपूर, दि.01 फेब्रुवारी (प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आजपासून शिथिलता देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित वेळेनुसार ऑनलाइन तिकीटासह खुली राहतील.
सर्व प्रेक्षणीय स्थळे ज्यांचे तिकीट आहे ते नियमित वेळेनुसार खुले राहतील. या ठिकाणांवर केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. कोणत्याही वेळी 100 किंवा 50% क्षमता संख्या यामध्ये जी संख्या लहान असेल तेवढ्या व्यक्तींच्या प्रवेशाला अनुमती असेल.
स्पा 50% क्षमतेने खुली राहतील. ब्युटी सलून व हेयर कटिंग सलूनसाठी सध्या असलेलेच नियम लागू राहतील. अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल. इनडोअर व आऊटडोअर खेळांना प्रेक्षकांशिवाय अनुमती असेल. खेळाडू व व्यवस्थापक यांचे पूर्ण लसीकरण असणे अनिवार्य आहे व खेळाच्या ठिकाणी 100 किंवा 50% क्षमता यामध्ये जी संख्या लहान असेल तेवढ्या खेळाडूंना प्रवेशाची अनुमती असेल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशपत्रानुसार सदर आदेश महानगपालिका क्षेत्र वगळून नागपूर जिल्हा क्षेत्राकरीता आजपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.






