नागपूर दिनांक 18 सप्टेंबर ( प्रतिनिधी)
नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर, हिंगणा, मौदा, पारशिवणी, नागपूर ग्रामीण या पाच तालुक्यात लम्पी आजाराचा अधिक प्रादुर्भाव असून आतापर्यंत तीन जनावरे मृत्युमुखी पडली असून 38 जनावरे बाधित आहेत. तथापि, हा आजार लसीकरणानंतर हमखास बरा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आज राज्य शासनाकडून अतिरिक्त एक लाख प्रतिबंधात्मक लसी विमानाने नागपूर जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात युद्ध स्तरावर लसीकरण सुरू आहे.
विदर्भात नागपूर जिल्ह्यातील वाढते बाधित लक्षात घेता मापसूचे संचालक संशोधक डॉ. अनिल भिकाने यांनी आज जिल्ह्यातील पशुसंवर्धन विस्तार अधिकाऱ्यांना या साथ रोगाबद्दल प्रभावीपणे, नेमका व तातडीचा उपचार करण्यासाठी मार्गदर्शन केले.
नागपूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी या आजाराचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला आहे. त्या ठिकाणी उपचाराचे केंद्र समजून पशुसंवर्धन विभाग कार्यरत झाला आहे.
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या नऊ ठिकाणी आजाराची तीव्रता अधिक आहे त्या ठिकाणाच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व पशूंचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे या भागातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आजारावर इलाज असून 100% यातून जनावरे बरी होतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र लक्षणे दिसताच लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जवळच्या पशुसंवर्धन केंद्रात किंवा ग्रामपंचायतीला माहिती द्यावी ,असे आवाहन त्यांनी केले.
हा आजार जनावरांपासून माणूस प्रजातीमध्ये पसरण्याची शक्यता नाही.अशा पद्धतीचे कोणतेही तथ्य अद्याप मांडण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणत्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गौशाळा, रस्त्यावरील मोकाट जनावरे, यांच्याबाबतीतही प्रशासन लक्ष ठेवून असून अनेक ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येईल.
यासंदर्भात राज्य शासनाचा १९६२ हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असून नागरिकांना अशा पद्धतीचे जनावर आढळून आल्यास त्याची माहिती ते या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकतात.






