यवतमाळ दिनांक 26 जानेवारी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदीबद्दल दिलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू असतानाच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी हेडगेवार यांच्या संदर्भात वक्तव्य दिले आहे ज्याने वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
माजी सरसंघचालक हेडगेवार यांच्याबाबत वक्तव्य करुन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. वसंत जिनिंगमध्ये माजी आमदार वामनराव कासावर यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी हे वक्तव्य करीत भाजपावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेते डॉ. महेंद्र लोढा यांचा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सोहळ्यातत उपस्थित ऊर्जामंत्री राऊत यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनेचा संदर्भ देत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार यांच्यावरच प्रहार केल्याने संघप्रणित कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. डॉ. लोढा यांचा पक्ष प्रवेश सोहळा वादाच्या भोवऱ्यांत सापडताना दिसत आहे. कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांनी स्वातंत्र्यपूर्व संभाषणाचा दाखला देत सरसंघचालक हेडगेवार यांचेवर साधलेला निशाणा वादाचे मूळ ठरताना दिसत आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, नुकतीच सुभाषचंद्र बोस यांची जयंती झाली. कुठेतरी वाचलं की नाशिकला सरसंघचालक हेडगेवार होते. सरसंघचालक यांना भेटण्यासाठी बोस यांनी खासगी सचिवाला निरोप घेऊन पाठवले. त्यावेळी हेडगेवार यांनी टिंगल उडवित भेट नाकारली व म्हणाले की, त्यांना सांग की मी आजारी आहे, मी जर त्यांना भेटलो तर ब्रिटिश माझ्या सोबत काय करतील, मला जेल मध्ये टाकतील, हे वाक्य बाहेर उभा असलेल्या खासगी सचिवाने ऐकलं, असा गौप्यस्फोट यावेळी राऊत यांनी केल्याने वादंग निर्माण झाले आहे. तसंच, असे हे गुलाम लोक आपल्याला शिकवायला लागले आहेत, असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.






