यवतमाळ जिल्ह्यातील दोन अनाथ युवकांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न होणार साकार 

0
9

अनाथ प्रमाणपत्रामुळे टॉपच्या महाविद्यालयात प्रवेशाला लागला हातभार 

 

आई -वडिलांचे मायेचे आणि आधाराचे छप्पर गमावल्यावर बुद्धीच्या जोरावर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र पदव्युत्तर शिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास निर्माण झालेला अडसर शासनाच्या अनाथ प्रमाणपत्राने दूर केला आणि जिल्ह्यातील दोन हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’, या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना शिरोद्दत मानून आपले इच्छित शिक्षण जिद्दीने पूर्ण करण्याचा ध्यास घेणाऱ्या या दोन युवकांचे नाव आहे विशाल पांडुरंग ठाकरे आणि प्रणव मनोज पाटील.

विशाल हा मूळचा वाई रुई या गावचा (ता यवतमाळ). बालपणीच आईचा मायेचा हात तर वयाच्या 17 व्या वर्षी वडिलांचा आधार गेला. संपूर्णपणे कोलमडून पडलेल्या आयुष्याला विशालने कोणत्याही व्यसनाचा व वाईट संगतीचा स्पर्श न होऊ देता स्वतःच्या व बहिणीच्या उपजीविकेसोबतच शिक्षण पूर्ण करण्यासाठी पडेल ते काम केले. अनुश्री हॉटेलमध्ये वेटरच काम करून डीएड चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर यशदा आणि राज्य युवा प्रशिक्षण केंद्र पुणे येथे ट्रेनर आणि समन्वयक म्हणून काम केले. मात्र उत्तम वकील होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि कमी पैशात शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ऑगस्ट 2021 मध्ये शासनाने क-गट म्हणून अनाथ विद्यार्थ्यांना 1 टक्के आरक्षण लागू केले. प्रवेशासाठी काही गुणांचा अडसर निर्माण झाला. यासाठी अनाथ प्रमाणपत्र उपयुक्त ठरू शकते अशी माहिती मिळताच महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून त्यासाठी अर्ज दिला. महिला व बालकल्याण विभागाने दोनच दिवसात हे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात विशालला प्रवेश मिळाला.

 

*महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती कडू यांच्या संवेदनशीलतेमुळे मला दोन दिवसात प्रमाणपत्र मिळाले. आता माझे करियर मार्गी लागेल. मी उत्तम आयुष्य जगू शकेल आणि माझ्यासारख्या अनाथ आणि शिक्षणाचा ध्यास असलेल्या मुलांना मलाही मदत करता येईल. – विशाल ठाकरे.*

 

प्रणव हा मूळचा शिरसी (ता. नागपूर) येथील रहिवासी. बाबा या शब्दाचा अर्थ कळायच्या आतच वडिलांचा आधार गमावला, तर वयाच्या सातव्या वर्षी कर्करोगाने आईचे निधन झाले. बालपणीच अनाथ झालेल्या प्रणवला मामांनी सांभाळलं. प्रणवची बुद्धिमत्ता पाहून मामांनी त्याला चांगल्या शाळेत घातले. प्रणवने संगणक शास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्याला व्यवस्थापकीय सल्लागार होण्यासाठी एमबीएचे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी पात्रता परीक्षेत 95 गुण असूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. थोड्या गुणांनी अडकलेला त्याचा प्रवेश अनाथ प्रमाणपत्रामुळे सुकर झाला. प्रणवला शीर्ष क्रमवारीत वर असलेल्या मुंबईतील जमनालाल बजाज मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. परंतु तेथील शिक्षण शुल्क त्याच्या आवाक्याबाहेर जात आहे. एका होतकरू विद्यार्थ्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.

 

*मला मॅनेजमेंट कन्सल्टंट व्हायचे असून स्वतःची कंपनी उभी करायची आहे. माझ्यासारख्या अनेक मुलांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे माझे स्वप्न आहे. -प्रणव पाटील*

 

*अनाथ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून शासनाने क गट निर्माण केला असून यामुळे अनाथ वर्गासाठी 1 टक्का आरक्षण लागू केले आहे. विशाल आणि प्रणव सारख्या अनेक विद्यार्थ्यांना याचा उच्च शिक्षणासाठी लाभ होत आहे. समाजातील वयाच्या 18 वर्षाच्या आत आई- वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या पाल्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते. –

ज्योती कडू, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, यवतमाळ.*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here