अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा; पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

0
11

अकोला,दि.23– जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त भागातील तातडीची मदत देण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत ना.कडू यांनी आज आढावा घेतला. यावेळी विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिसन बाजोरिया, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, सदाशिव शेलार, विश्वजित घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर आदींची उपस्थिती होती.

आढावा बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत नागरिकांना मिळेल यासाठी प्रशासनाने काम करावे. तत्पूर्वी नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये द्या. मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये. अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेले रस्ते तात्काळ दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत सुरु होईल.यासाठी तत्परतेने मार्गी लावण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच नुकसान झालेल्या शेतीचे, पिकांचे व संपुर्ण खरडून गेलेली शेती असे वर्गीकरण करुन सर्वेक्षण तातडीने करा. यासाठी ड्रोनचा वापर करुन चित्रीकरणाचे कामे प्राधान्याने करून नुकसानीचे पंचनामे प्रशासनामार्फत शासनास सादर करण्याचे निर्देश ना. कडू यांनी दिले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here