• जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
• ‘सीएससी’, बँकेमध्ये विमा हप्ता भरता येईल
वाशिम, दि.15 : खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. खरीप हंगाम २०२१ करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी २३ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
सन २०२१-२२ खरीप हंगामाकरीता जिल्ह्यातील खरीप ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत करण्यात आला आहे. या योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर पिकास दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या पीक नुकसानीस संरक्षण मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. योजनेत सहभागी होण्याची मुदत २३ जुलै २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र (सीएससी) अथवा बँकेत जावून विमा हप्ता भरावा. या काळात सामुहिक सेवा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विमा कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी, बँक अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.






