वाशिमच्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
9

वाशिम दि. २१ : केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना असंघटीत, नोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविण्यात येत आहे. सन २०२१-२०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत ही योजना ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या धर्तीवर राबविली जाणार आहे. योजनेविषयीची सविस्तर माहिती https://mofpi.nic.in/pmfme या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वाशिम जिल्ह्यासाठी सोयाबीन या पिकासाठी ही योजना मंजूर असून या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तसेच सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल तसेच लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रती सभासद याप्रमाणे ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देय राहील. या योजनेतर्गत शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक तसेच शासन यंत्रणा, किंवा खासगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ घेता येईल. तसेच या घटकांतर्गत नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी उत्पादनावर देता येतील. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी स्थरवृद्धी, आधुनिकीकरण या प्रकल्पांचे प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करता येतील.

सद्यस्थिती वैयक्तिक सूक्ष्म अन्न उद्योजकांनी एमआयएस पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. गट लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने जिहा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज निश्चित केलेल्या ‘एक जिल्हा, एक उत्पदान’साठी सादर करता येईल. सदर योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १३०, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २२ व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३ असा एकूण १५५ प्रकल्पांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील कदम (भ्रमणध्वनी क्र. ९८५०६४०९६४) किंवा वाशिम जिल्ह्याकरिता जिल्हा संसाधन व्यक्ती गोपाल मुठाळ (भ्रमणध्वनी क्र. ८६९८३२१९३०) यांच्याशी संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here