माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेमध्ये अमृत गटात सर्वोत्तम कामगिरीसाठी नागपूर महानगरपालिकची निवड झालेली आहे.
रविवारी ५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई मधील टाटा थिएटर, एन.सी.पी.ए. नरीमन पाँईंट येथे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर महानगरपालिकेला सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. हे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारतील.
विशेष म्हणजे, माझी वसुंधरा अभियानामध्ये मागील वर्षी नागपूर महानगरपालिकेची मोठी घसरण झालेली होती. यानंतर वर्षभर पर्यावरण संवर्धन व संरक्षण व जतन करण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे नागपूर महानगरपालिेकेने मुसंडी मारली आहे. मनपाच्या या यशासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचे मोठे योगदान असून या सर्वांचे अभिनंदन करीत मनपा आयुक्तांनी आभार मानले आहे.
वर्षभरात नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध उद्यानांमध्ये लघू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून त्याद्वारे प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्याचा वापर उद्यानांसाठी करण्यात येत आहे. मनपाच्या या पुढाकारामुळे भूगर्भातून उपसा होणाऱ्या पाण्याची बचत झालेली आहे. याशिवाय नवीन इमारतींचे बांधकाम करताना त्यात रेन वाटर हार्वेस्टिंगची व्यवस्था आहे की नाही हे तपासण्यासाठी महत्वाची जबाबदारी नगर रचना विभागाद्वारे घेण्यात आली. रेन वाटर हार्वेस्टिंग प्रणाली नसल्यास इमारत नकाशा मंजूर न करण्याच्या अटीमुळे नागपूर शहरात नवीन बांधकाम झालेल्या अनेक इमारतींमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावण्यात आली आहे. या पुढाकारामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळीत वाढ करण्याचे कार्य करण्यात आले आहे. याशिवाय नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध भागांमध्ये, मोकळ्या जागांमध्ये विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. अग्निशमन विभागाद्वारे नागपूर शहरातील विहीरींची स्वच्छता करून तेथील पाण्याचा वापर उद्याने झाडांसाठी करण्यात येत आहे. याशिवाय मनपातर्फे वाटर ऑडीट करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासंदर्भात मनपाच्या अधिकृत सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. या सर्व कार्यामुळे व यासाठी नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे मनपाला हे यश मिळू शकल्याची भावना मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी़. यांनी व्यक्त केली.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर स्पर्धेमध्ये मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये नागपूर महानगरपालिकेने वर्षभर राबविलेल्या विविध पर्यावरणीय उपक्रमांचे फलीत मनपाला मिळालेले आहे. मागील वर्षी पिछाडीवर असलेली नागपूर महानगरपालिका विविध उपक्रम आणि कार्यांमुळे आज पुढे आलेली आहे. पुढे आणखी उत्तमोत्तम कार्य करून मनपाचा दर्जा आणखी उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
माझी वसुंधरा अभियानातील सर्वोत्तम कामगिरीसाठी मनपाचा सन्मान
रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार पारितोषिक : अमृत शहरांमध्ये नागपूरची निवड






