यवतमाळ दिनांक २१ मे (प्रतिनिधी):
*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे परिपत्रक*
• तालुकास्तरीय समितीने दर महिण्यात आढावा घ्यावा
• तलाठ्यांनी आवश्यक दस्तावेज तात्काळ द्यावे
• पोलीस पाटील प्राथमिक अहवाल देतील
• कृषी पर्यवेक्षक प्रस्ताव सादरकर्ता प्राधिकारी
• दर सोमवारी जिल्हास्तरावर आढावा घेणार
• प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी 23 मे ते 6 जून विशेष मोहीम
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता, ज्याप्रमाणे शेतक-यांनी आत्महत्या केल्यास २४ तासाचे आत प्राथमिक अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करण्यात येतो तसाच प्राथमिक अहवाल तालुक्यात शेतक-याचा अपघात झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात संबधित तहसिलदार/तालुका कृषी अधिकारी यांनी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल एका परिपत्रकान्वये दिले आहेत.
शेती व्यवसाय करतांना होणारे विविध अपघातामूळे शेतक-यांस मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमाछत्राचा लाभ संबंधित शेतक-यास व त्यांच्या कुटुंबास देण्यात येतो . या योजने अंतर्गत तालुकास्तरावर तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात गट विकास अधिकारी, विमा सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी, संबधित विमा कंपनीचे प्रतिनिधी हे सदस्य असून तालुका कृषी अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात.
शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना तात्काळ आर्थीक मदत मिळणेकरीता तसेच शेतक-यांना
अपघाती अपंगत्व आल्यास त्यांना आर्थीक मदत मिळणेकरीता विहित नमुण्यात क्लेम फॉर्म भाग १ सोबत ७/१२, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यु, पाण्यामध्ये बुडून मृत्यु, उंचावरुन पडुन झालेला मृत्यू, सर्पदंश / विंचू व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल, घटनास्थळ पंचानामा, वयाचा दाखला यासह प्रस्ताव समितीने दाखल करुन घ्यावा.
वरील आवश्यक कागदपत्राअभावी विलंब होऊ नये याकरीता तालुकास्तरीय समितीने दर महिण्यात एकदा प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेवून प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना परिपत्रकात दिल्या आहेत.
सर्व तलाठी यांनी त्यांच्या साज्यात शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास अपघात विमा करीता लागणारे आवश्यक दस्ताऐवज ७/१२, गाव नमूना ६ क व ६ ड अथवा वारसाच्या नोंदीबाबत फेरफार तातडीने संबधित कृषी पर्यवेक्षक यांना देण्यात यावा तसेच सर्व पोलीस पाटील यांनी त्यांच्या गावात (हद्दीत) शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास तात्काळ प्रथम माहिती अहवाल तहसिल कार्यालय व तालुका कृषी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
क्षेत्रीय स्तरावरील सर्व कृषी पर्यवेक्षक यांना दावा/ प्रस्ताव सादरकर्ता प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील दुर्घटने संदर्भात पूर्वसूचना प्राप्त होताच संबंधित अपघातग्रस्त शेतकरी व मृत शेतक-यांचे वारसदार यांचेशी संपर्क साधावा व अर्जाच्या विहित नमुन्यात माहिती शेतक-यांकडून संकलीत करण्यासाठी व संबधित शासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवून कागदपत्रे उपलब्धतेबाबत शेतकरी कुटुंबास मदत करावी.
तालुका कृषी अधिकारी यांनी सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीता योजनेची प्रसिध्दी करावी. उपविभागीय कृषी अधिकारी हे विविध कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रलंबित राहणा-या प्रकरणांच्या बाबतील आढावा घेऊन संबधित यंत्रणेकडून पाठपूरावा करुन कागदपत्रे प्राप्त करुन घेण्यासाठी विशेष प्रयत्न करतील.
सध्या प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी 23 मे ते 6 जून या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत यात त्रुटीची पूर्तता करून घेण्याचे तसेच एखाद्या कागदपत्राअभावी विमा योजनेचा प्रस्ताव प्रलंबित असल्यास पर्याय कागदपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
जिल्हयातील शेतकरी अपघाती मृत्यु च्या प्रकरणांचा आढावा दर सोमवारी जिल्हा स्तरावर घेण्यात येणार असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने तालुकास्तरीय यंत्रणेने उचित कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.






