सतर्कता आणि समुपदेशाने थांबले एकाच दिवशी दोन बालविवाह

0
13

वाशिम दिनांक 20 (प्रतिनिधी) :

मालेगाव तालुक्यातील वाडीरामराव व मानोरा तालुक्यातील कोलार येथे ९ मे रोजी होणारे अल्पवयीन बालिकेचे बालविवाह महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेने आणि समुपदेशनाने रोखण्यात यश आले.

बालविवाह खरं तर होऊ नये यासाठी कडक कायदे आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषींना दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि आर्थिक दंड केला जाऊ शकतो. परंतू या कायद्यांना न जुमानता लपूनछपून बालविवाह करण्याचे प्रमाण व बालविवाह तत्परतेने थांबविण्याचे प्रमाण जिल्ह्यामध्ये जास्त आहे.

बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या अनेक रूढी परंपरा समाजातून हद्दपार होऊ लागल्या आहेत. भारतीय राज्यघटनेतील समतेचे तत्व आता सर्वत्र रुळू लागले आहे. मात्र अजूनही ‘मुलगी झाली हो’ हे सांगतानाचे चेहऱ्यावरील नैराश्य अनेक जण लपवू शकत नाहीत.

मुलगी म्हणजे समाजाचे ओझे आहे ही भावना अद्यापही कायम असल्यामुळेच जिल्हयात कधी स्त्रीभृणहत्या तर कधी बालविवाह असे विषय पुढे येत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय तसेच चाईल्ड हेल्प लाईन १०९८ यांच्याकडून प्राप्त गोपनीय माहितीनुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष वाशिम यांना तात्काळ माहिती मिळताच दोन पथके तयार करून मालेगाव व मानोरा तालुक्यातील हे दोन बालविवाह समुपदेशनाने थांबविण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे, सामाजिक कार्यकर्ता अनंता इंगळे, क्षेत्रीय कार्यकर्ता एकनाथ राठोड तसेच मालेगाव तालुक्यातील संरक्षण अधिकारी एम. के.जऊळकर, समुपदेशक श्रीमती अनिता काळे, क्षेत्रीय कार्यकर्ता रामेश्वर वाळले तसेच चाईल्ड लाईनचे सदस्य अविनाश सोनुने, गोपीशंकर आरु, अविनाश चौधरी, जऊळका पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय देवळे, जामकर, ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

विशेष म्हणजे महिला व बाल विकास विभाग वाशीम, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, वाशिम १०९८ मार्फत सततच्या सतर्कतेने बालविवाह थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सदर पथकाच्या मदतीने अल्पवयीन बालिकेचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन करून बाल विवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेण्यात आले.

यापुढे अशा प्रकारचे कोणतेही बालविवाह होत असल्यास चाईल्ड लाईनच्या १०९८ तसेच पोलीस यंत्रणा ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती दयावी. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here