सरस्वती मंदिर या संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचे आयोजन 17 एप्रिलला

0
14

नागपूर दिनांक 15 एप्रिल ( महानगर प्रतिनिधी)

उद्धारावा स्वये आत्मा हे ब्रिद जपणाऱ्या सरस्वती मंदिर, रेशीमबाग या संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचे रविवारी ता. १७ एप्रिल रोजी संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०.३० वाजता सोहळ्याला प्रारंभ होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी राहणार असून प्रमुख पाहुण्या या नात्याने  सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉ. राणी बंग उपस्थित राहतील. कार्यक्रमात संस्थेतर्फे संचालित कल्याण मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी महाराष्ट्र दर्शन हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे तसेच विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल.

दि. २१ जानेवारी १९२१ रोजी रथसप्तमीच्या शुभ मुहूर्तावर शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या अध्यक्षतेखाली तिळगुळ समारंभाच्या निमित्याने सभा भरली त्यात महिलांच्या धार्मिक, आरोग्यविषयक बाबींना व त्यांच्या हस्तकौशल्यास उत्तेजन देण्यासाठी एखादे मंडळ किंवा संस्था असावी असा विचार पुढे आला. २२ जानेवारीला महालमधील भोसलेंच्या तुळशीबागेत श्रीमती सुंदराबाई साने यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. ल.वा. परांजपे, डॉ. चोळकर व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक दादासाहेब ओगळे यांच्या उपस्थितीत व प्रेरणेतून सरस्वती मंडळ संस्थेची स्थापना झाली.

या संस्थेचा आज कल्याण मूकबधिर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बॅडमिंटन हॉल, कर्मचारी महिला वसतिगृह, स्व. सौ. विद्यावती जोगळेकर वाचनालय, महाल व खंडोबा बालवाडी, महाल व रेशिमबाग भजनी मंडळ, आरोग्य केंद्र असा विस्तार झाला आहे.

संस्थेच्या अध्यक्ष शैलजा सुभेदार असून अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. विभावरी दाणी (उपाध्यक्ष), शुभदा आंबेकर (सचिव), अंजली लघाटे (कोषाध्यक्ष), शुभदा साधू (सहसचिव), मीरा घोंगे (सहसचिव) ,राखी जामकर यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here