नागपूर दिनांक 19 मार्च (महानगर प्रतिनिधी)
– नागपूरकरांसोबत साजरा केला संगीत कारकीर्दीचा रौप्य महोत्सव
– खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उत्तरार्धाचे थाटात उद्घाटन
शंकर-एहसान-लॉय या संगीतकार त्रिकूटाने अनेक सुमधूर गीतांची भेट देशवासियांना दिली. त्यांच्या संगीत कारकीर्दीचा रौप्य महोत्सव सुप्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांनी शनिवारी नागपूरकरांसोबत साजरा केला.
या त्रिकूटाने संगीतबद्ध केलेले गीत ‘दिल चाहता है… कभी ना बीतें चमकीले दिन’ या गीतासह भजन, गणेशवंदना, शास्त्रीय, रॉकींग अशी विविध प्रकारची गीते शंकर महादेवन यांनी सादर केली आणि नागपूरकर या गाण्यांवर थिरकले.
साहित्य, संस्कृती, संगीत, नाट्य, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उत्तरार्धाचे शनिवारी ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.
मंचावर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार कृपाल तुमाने, महापौर दयाशंकर तिवारी, सर्व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, समीर कुणावार, सुधाकर देशमुख, परिणय फुके, विकास कुंभारे, नागो गाणार, मोहन मते, माजी मंत्री प्रवीण खोटे पाटील, डॉ. मिलिंद माने, प्रवीण दटके, विकास महात्मे,अॅड. सुलेखा कुंभारे, डॉ. मदन कापरे, डॉ. विभा दत्ता, सुरेश शर्मा यांची उपस्थिती होती.
सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह नागपूरची युवा गायिका श्रीनिधी घटाटे यांचा नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीनिधीचे शंकर महादेवन यांनी भरभरून कौतूक केले.
‘वक्रतुंड महाकाय’, गणणायकाय गणदैवताय… या गणेशवंदनांनी शंकर महादेवन यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.
‘नितीन गडकरी यांच्यासारखा नेता देशाला लाभला असून देश विकासाच्या वाटेवर चालत आहे. आजचा हा कार्यक्रम दोन वर्षापूर्वी स्वप्नवत होता. पण हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले असून नागपूरच्या रसिकांच्या प्रतिसादाने खूष आहे’, असे शंकर महादेवन म्हणाले.
‘लक्ष्य’ हे गीत त्यांनी डॉक्टर, सैनिक आणि फ्रंटलाईन वर्करला समर्पित केले तर ‘प्रिटी वुमन’ हे गीत वुमन पॉवर ला समर्पित केले. घेई छंद, बगळ्याची माळ अशा मराठी गीतांसह तेरे नैना, रॉक ऑन, सजदा, दिलबरो, बोलना हलके हलके आणि काही अनप्लग गाणी जसे आओना, जाने क्यूं, सलामे इश्क, सॅनोरिटा, कजरारे, कल हो ना हो अशी विविध प्रकारची गीते सादर करून नागपूरकरांनी मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक जयप्रकाश गुप्ता यांनी केले. प्रा. राजेश बागडी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील यांनी केले आहे.






