शेतकऱ्यांना बांधापर्यंत जाण्यासाठी पांदनरस्त्यांची कामे – पालकमंत्री सुनील केदार

0
10

वर्धा, दि.2 मार्च (प्रतिनिधी) :

Ø पालकमंत्र्यांच्याहस्ते पांदनरस्त्याचे भुमिपूजन

Ø गिरोली येथील ग्रामपंचायत इमारतीचे भुमीपूजन

भारत हा कृषिप्रधान देश असून कृषि प्रधान देशातील शेतकरी उपेक्षित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांकरीता विविध योजना राबवून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्यासाठी पांदनरस्ते बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल गाव व बाजारापर्यंत नेणे सोईचे होईल, असे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

सेलू तालुक्यातील बोरखेडी येथे बोरखेडी ते जुवाडी या पांदनरस्त्याच्या मजबुतीकरण कामाचे भुमीपूजन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, मनोज चांदूरकर, जिल्हा परिषद सदस्य सौरभ शेळके, बोरखेडीच्या सरपंच रेखा पंधराम, झडशीच्या सरपंच शुभांगी हळदे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पेंदे, सेलुचे तहसिलदार महेंद्र सुर्यवंशी, गटविकास अधिकारी शालीकराम पडघन आदी उपस्थित होते.

लोकनेते प्रमोद शेंडे यांनी सुरु केलेल्या विकासाच्या कामाला गती देण्याचे काम शासन करीत असून खऱ्या अर्थाने लोकांच्या घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचे काम शासन करीत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता, शेताला पाणी व मोटार पंपाला वीज जोडणी देण्याच्या कामाला शासन प्राधान्य देत असल्याचे केदार म्हणाले. बोरखेडी ते जुवाडी या पांदन रस्त्याचे चांगल्या दर्जाचे बांधकाम करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला त्यांनी दिल्या. यावेळी मनोज चांदुरकर यांचेही भाषण झाले.

सेलू तालुक्यातील गिरोली (ढगे) येथे 14 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीचे भुमीपूजन पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते करण्यात आले. गिरोली (ढगे) गावाच्या परिसरातील शेतातील शेतपिकांचे समृध्दीच्या कामावरील वाहतुकीमुळे नुकसान झाले होते. या नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळण्यासाठी समृध्दीच्या अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी मागणी केलेली असल्याने ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here