अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू काल सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी अकोल्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर बच्चू कडू जिल्हा रूग्णालयात तेथील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गेलेत. जिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याचे व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी ‘व्हायरल’ झाले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी थेट रूग्णालयातील मेसमध्ये जात त्याची तपासणी केली.
रूग्णालयातील मेसची जबाबदारी साहेबराव कुळमेथे या कंत्राटदाराकडे आहे. तर याच मेसमध्ये सुनिल मोरे हा कंत्राटी स्वयंपाकी आहे. यावेळी बच्चू कडू यांनी दररोज तूर आणि मूगदाळ किती लागते असा प्रश्न मेसचे प्रमुख कुळमेथे यांना विचारल्यावर त्यांनी 23 किलो असं उत्तर दिलं. हाच प्रश्न नंतर पालकमंत्र्यांनी जेवण बनवणारे स्वयंपाकी सुनिल मोरे यांना विचारल्यावर त्यांनी आठ ते दहा किलो असं उत्तर दिलं. यानंतर डाळींच्या एका दिवशी 12-13 किलोचा अपहार होत असल्याचं कडू यांच्या लक्षात आल्यानं त्यांचा पारा चढला अन् त्यांनी थेट स्वयंपाकी सुनिल मोरे याच्या कानशीलात लगावली. पालकमंत्र्यांच्या या रूद्रावतारानं मोरेसह उपस्थित सर्वच स्तब्ध होऊन गेलेत.






