ई-नाम योजनेत जिल्ह्यातील चार बाजार समित्यांचा समावेश

0
8

समित्यांना संगणक व इतर साहित्यांचे वाटप

 कृषी मालाचे लिलाव ऑनलाईन होणार

 मालाच्या प्रतवारीसाठी अत्याधुनिक मिटर

वर्धा, दि.12 (प्रतिनिधि):- बाजार समित्यांमध्ये शेतक-यांच्या मालाची विक्री अधिक पारदर्शक व शेतकरी हिताची होण्यासाठी केद्र शासनाच्या वतीने ई-नाम ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत जिल्हयातील वर्धा, सिंदी, हिंगणघाट व आर्वी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. योजने अंतर्गत कृषी मालाचे ई-ऑक्शन होणार असून त्यासाठी या समित्यांना अत्याधुनिक साहित्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. शेतक-यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या योजनेची व्यापक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने ई-नाम ही योजना सुरु करण्यात आली असून राज्यातही ती मोठया प्रमाणात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत बाजार समित्यांमध्ये प्राप्त होणा-या शेतक-यांच्या कृषी मालाची ऑनलाईन नोंदणी बाजार समितीच्या प्रवेशाच्या वेळीच घेतली जाते. प्रवेशाच्या वेळीच शेतक-यांच्या मालाला लॉट नंबर दिला जातो. यामध्ये कोणत्या शेतक-याचा कोणता आणि किती माल विक्रीस असणार आहे. याचा उल्लेख केला जातो. त्याप्रमाणे शेतक-याचे कृषी मालाचे लॉट ऑनलाईन ई-नाम प्रणालीवर विक्रीस उपलब्ध करुन दिल्या जाते. बाजार समितीतील खरेदीदार व्यापारी ऑनलाईन दर नोंदवितात. ज्या व्यापा-याचे दर अधिक असतात त्या व्यापा-यास सदर लॉट विकल्या जातो. यामध्ये शेतक-याचे देणे सुध्दा ऑनालाईन देण्याची सुध्दा सुविधा आहे.

या योजनेसाठी वर्धा, सिंदी, हिंगणघाट व आर्वी या कृषी उत्पन्न् बाजार समित्याची निवड झाली आहे. या समित्यांना ई-ऑक्शनसाठी संगणक, युपीएस, टॅबलेट, प्रिंटर, प्रतवारी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या योजनेमुळे चार बाजार समित्यामधील शेतक-यांच्या कृषी मालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार अधिक पारदर्शक व गतीमान होणार आहे. याचा शेतकरी व विक्रेते दोघांनाही लाभ होईल व वेळेची बचत होतील.

वेगवेगळया कृषी मालाची प्रतवारी बाजार समितीच्या आवारात नियुक्त असलेल्या ग्रेडर कडून केली जाते. प्रतवारीसाठी या योजने अंतर्गत या चार बाजार समित्यांमध्ये लॅबची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये मालाची आद्रता, तसेच धान्याची प्रतवारी करण्याच्या यंत्रांचा समावेश आहे. जिल्हाधिका-यांनी शेतक-यांची ही हिताची योजना चारही बाजार समित्यांमध्ये चांगल्या पध्दतीने राबविण्याचे निर्देश दिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here