शेतकऱ्यांनो,अतिवृष्टीने खचून जाऊ नका शासन तुमच्या पाठीशी’ :जिल्हाधिकारी अमोल येडगे

0
14

 उमरखेड, महागाव, आर्णी व यवतमाळ तालुक्यात पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद 

 पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तक्रार नोंदवण्याचे आवाहन

 नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

 उमरखेड तालुक्यातील बस दुर्घटनास्थळाची पाहणी 

 पीकविमासाठी सर्व तहसिलदार व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी

 महसूल, कृषी व जि.प.द्वारे पिक कापणी प्रयोग पुर्ण करण्याचे निर्देश

 

यवतमाळ दि. 30 सप्टेंबर : जिल्ह्यात संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूर परिस्थतीमुळे ज्या-ज्या भागात नुकसान झाले आहे, त्या प्रत्येक ठिकाणचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज उमरखेड, महागाव, आर्णी व यवतमाळ तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी दौऱ्याप्रसंगी दिले तसेच नुकसानग्रस्त शेत शिवारात भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला व ‘शेतकऱ्यांना, खचून जाऊ नका, शासन तुमच्या पाठीशी आहे’ असा दिलासाही दिला.

जिल्ह्यात साडेतीन लाखावर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा नोंदविला आहे, यापैकी ज्यांचे नुकसान झाले आहे त्या जास्तीत शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे 72 तासाचे आत तक्रार दाखल व्हावी यासाठी महसुल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करून संबंधीत शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्यास मदत करावी, कोणाचाही अर्ज किरकोळ कारणासाठी परत करण्यात येऊ नये. विमा संदर्भातील सर्व अर्ज कृषी विभागाच्या सौजन्याने पीक विमा कंपन्यांनी ऑफलाईन स्वरूपात घ्यावे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ भेटेल या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा व पिक विमा कंपनीने कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे आज सकाळी सात वाजताच उमरखेड येथे दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी दहागाव नाल्यावरील पुलाची पाहणी केली दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एका दुर्घटनेत नांदेड-नागपूर बस वाहून चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी पैनगंगा नदीच्या मारलेगाव पुलावर जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच पुराचा वेढा पडलेल्या संगम चिंचोली या गावाची भेट दिली. उमरखेड येथून जिल्हाधिकारी येडगे यांनी महागाव, आर्णी व यवतमाळ तालुक्यातील गावात भेट दिली. यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ, रामनगर तांडा, माळुंगी व खरोला येथे भेट देवून शेत नुकसानीची पाहणी केली सर्व ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महसूल, कृषी व जील्हा परिषद यंत्रणेद्वारे प्रक्षेत्रावर जावून वस्तुनिष्ठ पिक कापणी प्रयोग पुर्ण करण्याचे व ऑनलाईन नोंदीद्वारे त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व तहसिलदार व कृषी अधिकारी यांना दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत 44 हजार 590 तक्रार अर्जानुसार प्राप्त झाले असून पुढील दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणात पिक नुसानीचे तक्रार अर्ज प्राप्त होतील, त्यामुळे विमा कंपनीने देखील आपल्या प्रतिनिधींची संख्या वाढवून पुढील तीन ते चार दिवसात सर्वेक्षण पुर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. जे विमा प्रतिनिधी कामात हयगय करतील त्यांचेवर कारवाई प्रस्तावीत करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार आनंद देवूळगावकर(उमरखेड), विश्वांभर राणे (महागाव), परसराम भोसले (आर्णी), कुनाल झाल्टे (यवतमाळ), संबंधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी व आरोग्य अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी तसेच दूरदृष्य प्रणालीवर जिल्यामातील सर्व तहसिलदार, कृषी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here