स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आज मतदान
नागपूर दि. 20 दिसंबर : (ग्रामीण प्रतिनिधि)
नागपूर जिल्ह्यातील कुही व हिंगणा येथे होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसाठी व वानाडोंगरी येथे उद्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक मतदारांना एक दिवसाची सार्वजनिक सुटी मतदानासाठी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी या संदर्भातील अधिसूचना आज जारी केली आहे.
21 डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील नगरपंचायत कुही, हिंगणा तसेच वानाडोंगरी नगरपरिषद येथे निवडणूक होत आहे. नगर पालिका प्रशासन यांच्यातर्फे या संदर्भात आज एक पत्रक जाहीर करून या ठिकाणी एक दिवसाची सुटी स्थानिक मतदारांसाठी जाहीर करण्यात आली आहे.
ही सार्वजनिक सुटी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना लागू असणार आहे. या परिसरात मतदार असणारे मात्र अन्यत्र काम करणारे कर्मचारी, अधिकारी, कामगार यांना भर पगारी सुटी देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात दिले आहे.
सदर सार्वजनिक सुटी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, इत्यादींना लागू राहील. यामध्ये खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने, इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृह, नाट्यगृहे व्यापार, औद्योगिक उपक्रम व इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर,मॉल, रिटेल्स इत्यादी संस्थांचा समावेश आहे. येथील सर्व कामगारांना एक दिवस सुटी देण्यात यावी, असे निर्देश करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या तयारीत असणारे कार्यालय, शासकीय निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम, बँक या ठिकाणी काम करणारे कामगार, कर्मचारी, कुही, हिंगणा, वानाडोंगरी या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार असतील तर त्यांना सुटी देण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही कर्मचाऱ्याला, कामगाराला सुटी न दिल्यास मतदान करता येणे शक्य न झाल्यास त्याबद्दल तक्रार आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही जिल्हा प्रशासनाच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित असणाऱ्या मतदारांना उद्या सर्वांनी सुटी द्यावी,असे स्पष्ट निर्देशित करण्यात आले आहे






