नागपूर ऑक्टोबर ५: प्रतिनिधी
मेट्रो नागपूर प्रकल्पांतर्गत आनंद टॉकीज जवळील राज्यातील सर्वात मोठ्या कॅटीलिव्हर ब्रिजचे काम पूर्णत्वास आले असताना, आता रिच-४ मधील रूळ बसवण्याचे काम देखील महत्वाच्या टप्प्यावर पोचले आहे. या रिच मधील एकूण रूळ बसवण्याच्या कार्यापैकी केवळ सुमारे १० % कार्य शिल्लक असून ते देखील पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. वर्षाअखेर या भागातील प्रवासी सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.
मेट्रो प्रकल्पांतर्गत रिच-४ चा भाग सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान असून, या भागातील ट्रॅकची एकूण लांबी १६,०५० मीटर (अप आणि डाऊन दोन्ही मार्गिका सकट) आहे. एकूण १६,०५० मीटरपैकी १४,२०८ मीटर लांबीचे कार्य पूर्ण झाले असून केवळ १,८४८ मीटर लांबीचे ट्रॅक कार्य शिल्लक आहे. दुसऱ्या शब्दात या रीच मधील एकूण ट्रॅकच्या कामांपैकी ८८.५ % काम झाले आहे आणि उर्वरित कार्य लौकरच पूर्ण होणार आहे.
आधी सांगितल्या प्रमाणे, रिच ४ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा भाग येतो. या मेट्रो मार्गिकेला लागून किंवा जवळपास शहरातील अनेक महत्वाचे व्यावसायिक आणि निवासी परिसर आहेत. यात प्रामुख्याने वर्धमान नगर, इतवारी, गांधीबाग, कॉटन मार्केट महाल हे परिसर आहेत. मुख्य रेल्वे स्थानक देखील याच मेट्रो मार्गिकेवर आहे. शहरातील अतिशय गजबजलेला मार्ग अशी ओळख असलेला सेंट्रल ऍव्हेन्यू मधून मेट्रो मार्गिका जाते.
या मेट्रो मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु झाल्यावर शहरातील महात्मा फुले, संत्रा मार्केट किंवा कॉटन मार्केट या घाऊक भाजी किवा फळ बाजारात जाणे नागपूरकरांना सोपे होणार आहे. तसेच सध्या रेल्वे स्टेशन येथे उतरणाऱ्या प्रवाश्यांना ऑटो रिक्शा किंवा स्वतःच्या वाहनाने प्रवास करावा लागतो. या भागातील कार्य पूर्ण झाल्यावर येथे प्रवासी सेवा सुरु झाली कि ते मेट्रो ट्रेनने प्रवास करू शकतात. सध्या सेंट्रल ऍव्हेन्यू येथील वाहतूक बघता, तेथून राम झुला पर्यंत पोचायला बराच वेळ द्यावा लागतो, भविष्यात तो लागणार नाही हे नक्की.
या मार्गिकेला लागून असलेल्या व्यावसायिक भागात देखील जाणे येत्या काही दिवसात सुलभ होणार आहे. शहरातील पश्चिम भागातून पूर्वेला येणे देखील या भागातील प्रवासी वाहतूक सुरु झाल्यावर सोपे होणार आहे. एकूणच रिच ४ अंतर्गत ट्रॅक कार्य सुयोग्य पद्धतीने सुरु असल्याने या परिसरातील रहिवासी आता लवकरच मेट्रो प्रवास करू शकतील.






