ठाकरे -शिंदे वादाकडे संधी म्हणून पहा ,राज ठाकरे यांचे मनसे सैनिकांना आव्हान

0
13

महाराष्ट्र दिनांक 23 ऑगस्ट ( प्रतिनिधी)

राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पाहा, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. राज्यात सध्या जी परिस्थिती आहे त्याकडे आपण संधी म्हणून पाहिलं पाहिजे असं ते म्हणाले.

हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे पुन्हा राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. आज मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. यावेळी सर्जरीपूर्वी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काही कामं सोपवली होती, त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

 

तसेच, या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची निवडणूक रणनीती ठरल्याचीही माहिती आहे. तर, २३ ऑगस्टला राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.

या बैठकीत बोलताना राज म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात जी राजकीय परिस्थिती आहे. याकडे तुम्ही आता संधी म्हणून पाहिलं पाहिजे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्याकडे जमा केले पाहिजेत. सदस्य नोंदणी जास्त संख्येने कशी करता येईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच, राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत कार्यकर्त्यांना काय वाटतं, त्यांच्या भावना काय आहेत, हे प्रत्यक्ष भेटून जाणून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये सर्वच जागा आपण स्वबळावर कशा लढू शकतो याची चाचपणीही करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत. तसेच, आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार तेव्हा आणखी स्थानिक इतर गोष्टी जाणून घेईल, असंही त्यांनी सांगितलं. उद्या मनसेच्या संपूर्ण राज्यातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक रविंद्र नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here