नागपूर दिनांक 22 जुलाई ( प्रतिनिधी)
कोरोना प्रादुर्भावामुळे व नामांतरणासाठी बंधकारक ऑनलाईन आज्ञावली केल्याने नगर भूमापन अधिकारी क्र.2 नागपूर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.1 मध्ये 2021 मध्ये दाखल केलेली नामांतरण प्रकरणे प्रलंबित आहेत. ज्या मौजामध्ये प्रलंबित व त्रुटी असणाऱ्या प्रकरणांची संख्या जास्त आहे. अशा मौजासाठी मौजानिहाय फेरफार अदालत नगर भूमापन अधिकारी कार्यालय, नागपूर येथे 27 जुलै रोजी आयोजित करण्यात येत आहे.
संबंधित अर्जदार यांनी या कार्यालयात सादर केलेल्या प्रकरणाची पोहच पावती व त्यांचे प्रकरणाशी संबंधित सर्व मुळ कागदपत्रे व त्यांचा एक फोटो कॉपी सेट आदी समक्ष कार्यालयात हजर रहावयाचे आहे. फेरफार अदालतीचे अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या संबंधित अर्जदारास टोकन वाटप करण्यात येणार असून त्यानुसार त्यांचे प्रकरण परिरक्षण भूमापक यांची भेटीची वेळ देण्यात येणार आहे.
संबंधित परिरक्षण भूमापक यांचे स्तरावर प्रकरणांची तपासणी करुन नियमान्वये कार्यवाही करण्यात येणार आहे. उपस्थित होणाऱ्या अर्जदारांनी शासनाच्या सूचनेनुसार कोविड नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
फेरफार अदालत जनतेची कामे जलद गतीने व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त अर्जदारांनी या उपक्रमास प्रतिसाद देवून उपस्थित रहावे, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी सतीश पवार स्वप्ना पाटील यांनी केले आहे.
अदालतीमध्ये पुरविण्यात येणाऱ्या सेवा
प्रलंबित प्रकरणाबाबत येणाऱ्या अर्जदाराच्या अर्जाबाबत स्थिती सांगणे, त्रुटी असणाऱ्या प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्वरित कार्यवाही करणे. अर्जदारांना फेरफार मंजुरीसाठी नमुना 9 नोटीस प्राप्त होऊन मुदत संपली असल्यास प्रकरणाची तत्काळ तपासणी करुन त्वरित फेरफार मंजूर करणे. ईपीसीआयएस ऑनलाईन फेरफार प्रणालीबाबत तसेच नवीन ऑटो ट्रीगर फेरफार प्रणालीबाबत माहिती पुरविणे आदी सेवा अदालीमध्ये कार्यालयीन वेळेत पुरविण्यात येणार असल्याचे नगर भूमापन अधिकारी क्र.3 स्वप्ना पाटील यांनी कळविले आहे.






