पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये यादृष्टीने कार्यवाही करा: मनपा आयुक्त राधाकृष्ण बी

0
9

नागपूर दिनांक 17 मई ( शहर प्रतिनिधी)

लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यादृष्टीने पावसाळ्यापूर्वीच्या तयारीला गती देणे आवश्यक आहे. नदी, नाले व पावसाळी नाल्यांचे स्वच्छता कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल याकडे विशेषत्वाने लक्ष देउन शहरातील कुठल्याही रस्त्यावर पाणी साचू नये यादृष्टीने उपाययोजनात्मक कार्यवाही करा, असे सक्त निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.

मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी मंगळवारी (ता.१७) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये पावसाळ्यापूर्वी तयारीच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी,  सोनाली चव्हाण, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, गिरीश वानसिक, विजय हुमने, सहायक आयुक्त सर्वश्री अशोक पाटील, गणेश राठोड, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे उपस्थित होते.

पावसाळी नाल्यांची योग्य स्वच्छता करून रस्त्यावर कुठेही पाणी राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचित केले. पावसाळी नाल्या, सिवेज लाईन यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.

 

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या स्वच्छता कार्याचा झोननिहाय आढावा घेतला. नदी स्वच्छता कार्य करताना नदीतून काढण्यात आलेला कचरा, गाळ, माती हे सर्व तिथे टाकून राहणार नाही याची काळजी घेउन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे त्यांनी निर्देश दिले. तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे बहतांश कार्य पूर्ण झालेले असून उर्वरित कामाला गती देउन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

शहरात एकूश २२७ नाले असून नाल्यांच्या संदर्भात नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी राहू नयेत, नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकू नये यादृष्टीन झोन स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांनी निर्देशित केले.

नाले स्वच्छता कार्याला सुद्धा गती देण्याचे त्यांनी निर्देशित करतानाच शहरातील कोणत्याही नाल्यावर अस्वच्छता राहणार नाही, प्लास्टिक, कापड, थर्माकोल अशा वस्तूंमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी स्वच्छता केल्यानंतरही त्यात अस्वच्छता होउ नये यादृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here