महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असलं तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोरोना चाचण्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
राज्यात उठसूट कुणाचीही कोरोना चाचणी करणं आता पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क आणि कमी धोका असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी कोरोना चाचण्या केल्यानं पॉझिटिव्हीटी रेटवर परिणाम होतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली
राज्यात कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता ९३ टक्क्यांवर पोहोचलं आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर आला असल्याची माहिती टोपे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. राज्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली.






