पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजनीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे. भाजप आणि राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीनेही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील असे सर्वच मोठे नेते येथे प्रचाराला उतरले होते. त्याचाच फायदा इथे समाधान आवताडेंना झाला. राष्ट्रवादीकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतले अनेक नेते येथे तळ ठोकून होते. मात्र राष्ट्रवादीच्या या प्रचाराचं यशात रुपांतर झालं नाही.





