महाराष्ट्र दिनांक 23 मार्च (प्रतिनिधी)
सर्व सरकारी कर्मचाऱयांचे वय 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकदा आणि 50 ते 60 वयोगटात दोन वेळा संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी 250 कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्रात नागरीकरण वाढत असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने नगरपंचायती आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नागरी आरोग्य केंद्र उभारणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत केली.
अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेला उत्तर देताना राजेश टोपे बोलत होते. नागरी भागातील लोकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नगरपंचायतीमध्ये नागरी आरोग्य केंद्र उभारणार आहोत. पालिका क्षेत्रात 15 हजार लोकसंख्येला आरोग्य सुविधेसाठी केंद्र उभारण्यात येईल, असे टोपे यांनी जाहीर केले.
तालुक्याच्या ठिकाणी रक्तघटकांची तपासणी करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिह्याच्या ठिकाणी एमआरआय मशीन बसवण्यात येणार आहे. 100 खाटांच्या रुग्णालयांत सिटीस्कॅन यंत्रणा बसवण्यात येईल, अशी घोषणाही टोपे यांनी केली. प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग निदान मोबाईल व्हॅन तैनात करण्यात येणार आहे.






