नागपूर दिनांक 11 मार्च (महानगर प्रतिनिधी)
लग्नाचा मुहूर्त गुरुवार, १० मार्च २०२२ रोजीचा निघाला. मुला-मुलीकडील सर्व पाहुणे लग्नमंडपात जमले. मात्र, ऐन लग्नाच्या दिवशीच प्रशासनातील अधिकारी लग्नमंडपात पोहोचले आणि ‘हा विवाह होणार नाही’, अशी घोषणा केली. या लग्नसोहळ्यातील वधू १५ वर्षांची तर वर केवळ १८ वर्षांचा होता.
कळमना येथे अल्पवयीन मुलांचा विवाह होत असल्याची माहिती चाइल्ड लाइनकडून जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना देण्यात आली. पठाण यांनी ही माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अपर्णा कोल्हे यांना दिली. कोल्हे यांच्या आदेशानुसार पथक विवाहस्थळी पोहोचले. वर आणि वधूचे वयाचे दाखले तपासले असता ते दोघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होताच विवाह थांबविण्याची सूचना देण्यात आली. बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा-२००६ ची माहिती मुली-मुलींच्या आईवडिलांना देत त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले.
-तर सर्वांवर कारवाई!
बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार अल्पवयीन मुलांचे लग्न लावले तर मुला-मुलींचे नातेवाईक, डेकोरेशनवाला, आचारी, पंडितजी अशा सर्वांवर कार्यवाही होऊ शकते.






