प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत असून एका बैठकीत बोलताना करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
“मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी नेहमी गमछा आणि मास्क वापरत होते, मात्र त्याचदिवशी गमछा आणि मास्क दोन्ही गायब होते, याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता.”, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
तसेच, “याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व गमछा का घालून आले नाहीत? ते खरंच भावूक झाले की ठरवून झाले?यावर जनता प्रश्न करत आहे”, असेही नवाब मलिक म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रधानमंत्री निवडणूक प्रचारात व्यस्त असताना “देशात हजारोंच्या संख्येने लोकांनी जीव गमावला. औषधोपचार मिळत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आले. ते भावूक झाले याबाबत लोकं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.” असे सांगताना नवाब मलिक यांनी पीएम मोदींवर हल्लाबोल चढविला





