अहमदनगर : लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यानंतर पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पतीनेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरमध्ये समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणीने घरात आपली जीवनयात्रा संपवली, त्यानंतर कार्यालयात पतीने गळफास घेत आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 28 वर्षीय शिल्पा आणि 32 वर्षीय अजय कचरदास जाधव यांचा चारच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. शहरातील बीड रोडवर आदित्य गार्डन शेजारी जाधव दाम्पत्य राहत होते.
पतीची सुसाईड नोट सापडली
अजयने गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येला मी जबाबदार असून कोणासही दोषी ठरवू नये, असे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे
दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.





