कोरोनामुळे सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे परंतु या कठीण प्रसंगात भारतीय जनता पक्ष जबाबदारीने वागण्याऐवजी राज्य सरकारला अडचणीत कसे आणता येईल यातच वेळ घालवत आहे. केंद्र सरकारकडून या संकटात राज्याला भरीव मदत मिळणे आवश्यक आहे, त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारसोबत एकत्र येऊन केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. रेमडेसीवीर, ऑक्सीजन अभावी लोकांचे जीव जात आहेत ते वाचवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील जनतेशी आपली बांधिलकी जपावी आणि केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आलेली असतानाही, वैद्यकीय साहित्य व परवानग्यासाठी केंद्र सरकारकडे दाद मागावी लागते. राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारकडे रेमडेसीवीर, ऑक्सीजन व लसींसाठी पाठपुरावा करत आहे. परंतु केंद्र सरकार मात्र महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. राज्याला दररोज ५० हजार रेमडेसीवीर इंजेक्शन देण्याची राज्याची मागणी असताना केंद्र सरकारने फक्त २६ हजार देण्याला मान्यता दिली आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून मराठी माणसाला इंजेक्शन द्यायचे नाहीत हे बरोबर नाही. राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाचे मोल लक्षात घेतले पाहिजे. केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असताना गप्प बसून चालणार नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. या परिस्थितीत फडणवीस यांनी राज्य सरकारबरोबर एकत्र येऊन महाराष्ट्राचा आवाज बनून केंद्र सरकारकडे राज्यासाठी भांडले पाहिजे. रेमडेसीवीरचा तुडवडा असताना त्याचा काळाबाजार करणाऱ्यांसाठी दोन्ही विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना सोडवून आणतात. एवढी तत्परता या विरोधी पक्षनेत्यांनी जनतेचे जीव वाचवण्यासाठी दाखवली असती तर राज्यातील जनतेला आनंदच झाला असता. ज्या कंपनीच्या संचालकावर काळाबाजार केल्यामुळे गुजरातच्या वलसाड पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यासाठी विरोधी पक्षनेते एवढी तत्परता का दाखवतात? हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे.
कोरोनाच्या आजच्या विदारक परिस्थितीला बेफिकीर केंद्र सरकार जबाबदार आहे याचे वर्णन नाना पटोले यांनी एका शायरीतून केले आहे..”जब चुना ही उसे कत्ल ए आम का हुनर देखकर, तो अब क्या रोना, लाशों का शहर देखकर”!






