महाराष्ट्र दिनांक 29 जून (प्रतिनिधी)
मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार अल्पमतात असल्याचं पत्र देऊन फ्लोअर टेस्टची मागणी केली.
यानंतर ३० तारखेला विशेष अधिवेशन बोलवत राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव महाविकास आघाडी सरकारने सादर करावा असं म्हटलं आहे. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. अशात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत फोन केला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरेंनी फ्लोअर टेस्टमध्ये भाजपला पाठिंबा द्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंकडे केली आहे. या मागणीला राज ठाकरेंनी होकार दिला आहे अशी माहिती समोर आली आहे. मनसेचा एक आमदार विधानसभेत आहे. त्याचं बळ विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी भाजपला मिळणार आहे.
राज्यात ठाकरे विरूद्ध शिंदे असा सत्तासंघर्ष पाहण्यास मिळतो आहे. एकनाथ शिंदे हे २१ तारखेला ३० हून अधिक आमदारांसह आधी सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. आता हे सगळे आमदार आधी गोव्यात आणि मग मुंबईत परतणार आहेत.
सध्या एकनाथ शिंदेंकडे ५१ आमदारांचं बळ आहे. हे सगळे आमदार मुंबईत गुरूवारी परतणार आहेत. सत्ता नाट्यात पुढे काय काय घडतं फ्लोअर टेस्ट होते की नाही? फ्लोअर टेस्ट झाली तर त्यात सरकार पडणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गुरूवारी मिळणार आहेत.
राज्यात अभूतपूर्व राजकीय पेच २१ जूनला निर्माण झाला आहे. कारण शिवसेनेने भाजपसोबत गेलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे सांगत आणि इतर काही मागण्या करत या सगळ्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. हे बंड इतर बंडांपेक्षा वेगळं आहे कारण शिवसेना सत्तेत असताना शिवसेना आमदारांनी बंड पुकारलं आहे.
फ्लोअर टेस्ट ३० जूनला होणार आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा असं राज्यपालांनी सरकारला सांगितलं आहे. आता या सगळ्या परिस्थितीनंतर काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






