जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठीत

0
7

यवतमाळ दिनांक 23 मे  ( प्रतिनिधी)

 अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री आणि व्यापारावर राहणार नजर

 नागरिकांना अंमली पदार्थाबाबत माहिती असल्यास कळविण्याचे आवाहन

 

राज्यात मागील वर्षभरात अंमली पदार्थाचे सेवन, विक्री आणि व्यापार याबाबत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंमली पदार्थाचे तरुण पिढीला जडत असलेले व्यसन बघता जिल्ह्यातीलही वाढत्या अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी आणि ही समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने नार्को कॉर्डिनेशन सेंटर समिती जिल्हास्तरावर गठीत करण्याचा निर्णय घेतला. यवतमाळ जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती जिल्ह्यातील अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री आणि व्यापारावर लक्ष ठेवणार आहे.

नुकतीच या समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मानपिया, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, डॉ दयानंद चव्हाण, एन व्ही तंवर, टपाल विभागाचे बी के जाकुरे, तर ऑनलाईन पद्धतीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे इंटेलिजन्स निरीक्षक विजय शिंदे आणि औषधे सहाय्यक आयुक्त श्रीमती दातीर उपस्थित होत्या.

या बैठकीत जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या उत्पादन, विक्री आणि व्यापराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हयात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड कोणत्या भागात होते? अशा पद्धतीची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेण्यासंबधाने कृषी व महसुल विभाग यांनी याबाबत काळजीपूर्वक लक्ष देण्याबाबत सांगण्यात आले. शिवाय जिल्हयामध्ये अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

कुरिअर सोबतच खाजगी वाहतुकीवर राहणार लक्ष

कुरियर व टपाल विभागा मार्फतअंमली पदार्थाचा पुरवठा होणार नाही याबाबत दक्ष राहावे. विशेषकरुन यवतमाळ जिल्हा हा तेलंगणा राज्याचे शेजारील जिल्हा असल्याने तेलंगणा राज्यातुन अंमली पदार्थाची ट्रकव्दारे किंवा इतर वाहनातुन गांजाची तस्करी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सदर अंमली पदार्थ पांढरकवडा, मुकुटबन, या भागातुन वाहनातुन पुरवला जातो त्यादृष्टीने बॉर्डर सुरक्षा ही सर्तक राहून व्यवस्थीत तपासणे आवश्यक आहे. याशिवाय एस टी बस, ट्रक, लक्झरी, खाजगी व्यक्ती, यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार होतो का याची सुद्धा माहिती घेण्यात यावी.

जिल्हा पोलीस नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी केलेल्या कारवायांची माहिती संकलीत करुन त्याबाबतचा डेटाबेस तयार करावा. तसेच सदर समितीचे सहकार्याने जिल्हयातील अंमली पदार्थाच्या वाहतुकिला आळा घालणेसाठी उपाययोजना करण्यात यावी.

जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या व त्यांना कोणत्या अंमली पदार्थाचे व्यसन आहे याबाबत माहिती प्राप्त करुन घेण्यात यावी. सदर व्यक्ती कोणत्या अंमली पदार्थाचे सेवनाने व्यसनी झाला याकरीता सदर व्यक्तींचा पूर्व इतिहास तपासून वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्याने यासंबधाने सांख्यीकी माहिती गोळा करावी.

मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या वैद्यकीय वापरासाठी असलेल्या ड्रगचा वापर वैद्यकीय कारणाकरीताच होतो का? याबाबत नियंत्रण ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात अंमली पदार्थ ओळखण्यासाठी अमली पदार्थ चाचणी किट व चाचणी रसायने यांची उपलब्धता सुनिश्चीत करणे, तसेच सदर किटचे वापरासंबधी अधिकारी, पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण देण्याबाबत अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे अधिकारी यांनी संबधीत पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांचे प्रशिक्षण देण्याबाबत सुचित करण्यात आले.

जनजागृती

तरुण पिढी ही अंमली पदार्थाचे आहारी जात असुन व्यसनाधीनतेसोबतच गुन्हेगारीकडे वळत आहे. यासाठी जिल्हास्तरावर अंमली पदार्थाचे दुष्परीणामाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात यावे.

पोस्टर, बॅनर,तसेच समाज माध्यमातून जनजागृती करण्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. ग्रामीण भागातही ग्रामसभेच्या माध्यमातून लोकांपर्यंत अंमली पदार्थाचे दुष्परिणाम बाबत सातत्याने जनजागृती करण्यासही चर्चा करण्यात आली.

माहिती असल्यास इथे कळवा 

पोलीस विभागाव्यतीरिक्त इतर विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना गांजा,चरस व इतर अंमली पदार्थ लागवड,वाहतुक, विक्री ईत्यादी बाबत माहिती मिळाल्यास, त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक, यवतमाळ पोलीस अधीक्षक, कार्यालय यांचा 9850165432 या क्रमांकावर संपर्क करावा,असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here