नागपूर दिनांक 20 मई ( प्रतिनिधी)
शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागपूर महानगपालिकेद्वारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मे महिन्यातील पाण्याच्या वाढत्या वापरामुळे शहरातील काही भागात पाण्याची टंचाई भासत आहे. अशा टंचाईग्रस्त भागात टँकर वाढवून पाणीपुरवठा करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) च्या अधिकाऱ्यांना दिले.
शुक्रवार दिनांक 20.05.2022 रोजी नेहरूनगर झोन अंतर्गत वाठोडा व इतर भागातील पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजनांबाबत मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्तांच्या सभाकक्षात बैठक पार पडली.
यावेळी मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, नेहरूनगर झोनचे डेलिगेट जवाहर नाईक, तांत्रीक सल्लागार (NESL) मनोज गणवीर, ऑरेंज सिटी वॉटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, वरिष्ठ अधिकारी राजेश कालरा, एम. पी. सिंग आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या शहरातील पाण्याच्या सद्यःपरिस्थितीचा आढावा घेतला. शहरात ज्या भागात पाणी टंचाई आहे व नागरिकांना १३५ एलपीसीडी (लिटर प्रती माणुस प्रती दिन) पेक्षा कमी पाणी पुरवठा होत आहे, अशा भागात टँकरने पाण्याची व्यवस्था करावी. तसेच नागरिकांना नळाद्वारे पर्याप्त दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा, असेही निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
ऑरेंज सिटी वॉटर कंपनीतर्फे टँकरच्या चौकशी/मागणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002669899 व 9699757753 हा मोबाईल क्रमांक जारी करण्यात आलेला आहे. जर आपल्या भागात टँकर येत नसेल तर नागरिकांनी वर दिलेल्या क्रमांकावर कॉल करून टँकरबाबतची चौकशी करावी, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे. सदर टँकरद्वारे अधिकृत नळ कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांनाच पाणी पुरवठा करण्यात येईल असे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३५८ कोटीच्या आराखड्याचे आयुक्तांसमोर सादरीकरण केले. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ‘फीडर मेन’वर भर देण्यात आलेला असल्याचे यावेळी डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले.






