मालविका बन्सोडला ऑलिंपिकच्या सरावासाठी
१० लक्ष रुपयाचे सानुग्रह अनुदान
जिल्हाधिकारी आर.विमला यांचे हस्ते आई
डॉ. तृप्ती बन्सोड यांना धनादेश सुपूर्द
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय खेळाडू मालविका बन्सोड हिच्या उत्कृष्ट खेळाबद्दल ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याहस्ते मालविकाची आई डॉ. तृप्ती बन्सोड यांच्या कडे आज सुपूर्द करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व क्रीडा संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मालविका बन्सोडने आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिला हरवून आपले आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे. येत्या आगामी ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाने 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले आहे. नागपूरच्या महिला खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे, तिचा आदर्श ठेवून जिल्ह्यातील खेळाडूंनी नागपूरचे नाव लौकीक करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.






