आज जिल्हयात फेरफार अदालतीचे आयोजन

0
8

नागपूर दि.09 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

शेती, मालमत्तेसंदर्भातील फेरफार तातडीने निकाली निघावेत, यासाठी महाराजस्व अभियानाअंतर्गत आज बुधवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

एप्रिल 2016 पासून ऑनलाईन ई-फेरफार सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जनतेच्या तक्रारी राहू नये,अशी व्यवस्था ग्रामपातळीवर शासनाने केली आहे. तरीदेखील फेरफार संदर्भात सामान्य नागरिकांच्या काही तक्रारी आहेत. त्या सोडवण्याची फेरफार अदालत ही संधी असून नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी  फेरफार अदालतीची पाहणी तालुकास्तरावर जाऊन करणार आहेत.

एक महिन्याच्या वर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे, शासन निर्णयानुसार आवश्यक आहे. एका महिन्याच्यावर फेरफार प्रलंबित असल्यास मंडळ स्तरावर अदालतीचे आयोजन करणे आवश्यक असते. त्यासाठीचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक तहसील ठिकाणी उद्या ही अदालत आयोजित करण्यात येणार आहे. काही ठिकाणी मंडळ स्तरावरही आयोजनाची निर्देश देण्यात आले आहे. शासकीय निर्णयानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी सकाळी दहा ते पाच या कालावधीत फेरफार अदालतीचे आयोजन करणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे. यामध्ये फेरफार अदालतीच्या दिवशी प्रलंबित फेरफार नोंदीच्या संदर्भात अर्जदार व हरकतदार यांना आवश्यक त्या पुराव्यासह उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या अर्जदार व हरकतदार यांच्या उपस्थितीत प्रलंबित फेरफार उपलब्‍ध अभिलेख यावरून नियमानुसार असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच दिवशी प्रमाणित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here