पहिल्या डोसचे उद्दिष्ट पार; ‘बुस्टर’ २१ हजारावर
नागपूर, ता. २१ जानेवारी (प्रतिनिधी)
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये लसीकरण हाच एक प्रभावी उपाय आहे. नागपूर शहरातील जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे लसीकरणासाठी प्रभावीपणे अभियान राबविण्यात येत आहे. मनपाच्या या अभियानाला शहरातील नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असून आज नागपूर शहरात लसीकरणाच्या डोसने ३५ लाखांचा टप्पा पार केला आहे.
१८ वर्षावरील सर्व नागरिक, १५ वर्षावरील मुले आणि बुस्टर डोज असे सर्व मिळून नागपूर शहरातील ३५ लाख ७४ हजार ७१८ लसीकरणाचे डोस पूर्ण झालेले आहेत. यामध्ये पहिल्या डोसचे लसीकरण निर्धारित उद्दिष्ट पेक्षा जास्त झाले असून आतापर्यंत २१ लाख ६ हजार ७३९ एवढे लसीकरण झाले आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील युवांचे ६७०४९ एवढे तर बुस्टर डोसचे २१५२१ एवढे लसीकरण डोस झालेले आहेत.
नागपूर शहरात लसीकरणासाठी पात्र सर्व व्यक्तींचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात १५० वर लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून १८ वर्षावरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील युवांसाठी विशेष केंद्रांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि लसीकरण हे अत्यंत प्रभावी आहे. नागपूर शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने आपले लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपले लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे तसेच ज्यांचे दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झालेत त्यांनी ‘बुस्टर’ डोस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
मनपाच्या आरोग्य विभागानुसार १६ जानेवारी २०२१पासून नागपुरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली. पहिल्या टप्पयात आरोग्य सेवक, डॉक्टर, शासकीय कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, आजाराने ग्रस्त नागरिकांना लस देण्यात आली. पुढे १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात आली. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, दिव्यांग, भिक्षेकरू आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड सुद्धा नाही अशा नागरिकांचे सुद्धा मनपातर्फे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागानुसार ‘हर घर दस्तक’ मोहिम सुरु करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत लस न घेतलेल्या पात्र नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरणाकरीता प्रवृत्त करून शहरातील १००% पात्र नागरिकांना डोस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील १५ ते १८ वर्षावरील युवांचे लसीकरण सुरू करण्यात आले. दोन्ही डोस घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सच्या सुरक्षेच्यादृष्टीने बुस्टर डोस सुरू करण्यात आले आहे. नागरिकांकडून सुद्धा या संपूर्ण अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून त्याचेच फलित आज लसीकरणाचा टप्पा ३५ लाखांच्यावर गेला आहे.






