परमबीर सिंहच्या वसूली आरोपानंतर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते,त्याला आव्हान देणारी देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे. अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून कोर्टाच्या या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, असे जयंत पाटील यांनी नमूद केले. त्याचवेळी पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले आहे. सीबीआयचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर अनिल देशमुख त्यातून निर्दोष मुक्त होतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यानंतर ते पुन्हा राज्य मंत्रिमंडळात काम करताना जनतेला दिसतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष भक्कमपणे अनिल देशमुख यांच्यामागे उभा असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.






