नागपुर दिनांक 2 दिसंबर (विशेष प्रतिनिधि)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत खोटे शपथपत्र दाखल करून यश मिळविल्याचा आरोप करणारा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयापुढे दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश एस सैयद यांनी या प्रकरणी गडकरींना नोटीस बजावली आहे.
अॅड. सतीष उके यांनी हा अर्ज दाखल केला आहे. यात गडकरी यांनी निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शपथपत्रात गडकरी यांनी आपली संपत्ती, उत्पन्न तसेच वैयक्तिक माहिती चुकीची दिल्याचा दावा केला आहे. यामुळे मतदारांची दिशाभूल झाली. याच प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर गडकरीनींच नाना यांच्यावर पलटवार केला होता. पटोले यांनी या याचिकेसाठी दाखल केलेले शपथपत्र बेकायदेशीर असल्याचा प्रतिदावा केला होता. तसेच पटोलेंनी केलेले आरोप हे केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर करण्यात आलेत. आरोपांबाबत त्यांच्याकडे ज्ञान किंवा सबळ पुरावेही नाहीत, असा युक्तिवाद गडकरींतर्फे करण्यात आला आहे.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे. पुढील सुनावणीदरम्यान यावर निकाल अपेक्षित आहे. उच्च न्यायालयातील याचिका ही दिवाणी स्वरुपाची आहे. आता नाना पटोलेंचे वकील उके यांनी हेच आरोप करीत सत्र न्यायालयापुढे फौजदारी स्वरुपाची याचिका दाखल करीत फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.






