मुख्यमंत्री कार्यालय, वर्षा निवास्थान येथे पुन्हा करोनाचा शिरकाव

0
10

मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानात पुन्हा एकदा करोना विषाणूने शिरकाव केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर नाईक यांना करोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( CMO Maharashtra Covid Update )

मुख्यमंत्री कार्यालय व वर्षा निवासस्थान येथून थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या दोन्ही ठिकाणी वावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या काळजीत भर पडली आहे.

त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर नाईक यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच तातडीने उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर आवश्यक असलेली पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची कोविड चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे हे सध्या मानेच्या दुखण्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाली असून त्यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री कार्यालय व वर्षा निवासस्थानी करोनाचा धोका निर्माण झाल्यानंतर ठाकरे कुटुंबालाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here