शहरातील पहिल्या लॅक्टशन क्यूबिडचे लोकार्पण

0
12

 

*सीताबर्डी ग्लोकल मॉल येथे महिलांसाठी सुविधा :

स्मार्ट सिटीचा पुढाकार*

*नागपूर, ता. २ :* नागपूर शहरातील पहिले लॅक्टेशन क्यूबिड – पिंक केबिनचे ग्लोकल मॉल येथे महापौर दयाशंकर तिवारी आणि महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. उपस्थित होत्या.

महापौरांच्या संकल्पनेतून तथा महिला व बालकल्याण समितीच्या प्रयत्नाने व स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने पिंक केबिनची स्थापना करण्यात आली. या लॅक्टेशन क्यूबिड – पिंक केबिन (बाळांना स्तनपान करण्यासाठी) या विशेष केंद्रासाठी ग्लोकल मॉलतर्फे जागा उपलब्ध करण्यात आली.

यावेळी महापौरांनी सांगितले की, महिलांसाठी बाजारपेठेत अशा प्रकारच्या व्यवस्थेची गरज होती. महिला सगळ्या क्षेत्रात आपले नाव गाजवत असल्या तरी त्यांच्यासाठी सुविधा कमी आहेत. मनपा आणि स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने गांधीबाग उद्यानातही पिंक केबिनची व्यवस्था करण्यात येईल. त्यांनी अशी सुविधा सर्व झोनमध्ये देण्यासाठी स्मार्ट सिटीला पुढाकार घेण्याची सूचना केली. त्यांनी स्मार्ट सिटीतर्फे सर्व मॉलमध्ये पिंक केबिनची सुविधा देण्यासाठी विकास नियमावलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात मनपाला प्रस्ताव देण्याची सूचना केली. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल.

श्रीमती दिव्याताई धुरडे यांनी बाजारपेठेमध्ये महिलांसाठी सुविधा निर्माण केल्याबद्दल स्मार्ट सिटी व ग्लोकल मॉलचे अभिनंदन केले. त्यांनी अशी सुविधा मनपा मुख्यालय येथे लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले.

महापौरांच्या हस्ते ग्लोकल मॉलचे अनूप खंडेलवाल यांचा सत्कार करण्यात आला. महापौर दयाशंकर तिवारी आणि महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांचे स्वागत भुवनेश्वरी एस. यांनी केले. पिंक केबिन बद्दल माहिती डा प्रणिता उमरेडकर यांनी दिली.

कार्यक्रमात सहायक पोलिस निरीक्षक अमोल दोंड यांनी सायबर क्राईम या विषयावर नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीबद्दल मार्गदर्शन केले. स्टार्टअप संदर्भात उद्योजकांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘राज की बात’चे आर जे राज यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. या कार्यक्रमात शहरातील उद्योजकांनी आपल्या कामाबद्दल माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here