वाशीम दि 2 अक्टूबर (दिपक भारुका)
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस आज 2 ऑक्टोबरला वाशीम जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतातील नुकसानीची पाहणी करणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली .
गत आठ दिवसांपेक्षाही अधिक काळापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ चालविला होता. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणच्या शेतातील शेंगा काळ्या झाल्या, त्यांना बुरशी लागली, कोंब फुटले आहेत.
शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावल्या गेला आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. अतिवृष्ट्रीने झालेल्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 2 ऑक्टोबरला वाशीम जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.
सकाळी 11 :30 वाजता फडणविस मंगरूळनाथ तालुक्यातील मोझरी येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर वाशीम तालुक्यातील राजगांव येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली






