करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर शिर्डीत येणारे भाविक आणि संस्थानच्या कर्मचाऱ्यांसाठी नियम आणखी कडक करण्यात आले आहेत.
भाविकांनी व संस्थानाच्या कर्मचाऱ्यांनी मंदिरात येताना डबल मास्क लावूनच यावे. तसंच, दर्शनार्थींनी ऑनलाइन दर्शनपास घेऊनच यावे, असे आवाहन संस्थानाने केले आहे. (Shirdi Sansthan Trust)
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी यासंबंधी सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार, भाविकांनी डबल मास्क लावावे, वारंवार हात सॅनिटाइज करावेत, सामाजिक अंतराचे पालन करावे, दर्शनासाठी प्रवेश करताना दर्शन रांगेतील इतर वस्तूंना आणि श्रींच्या समाधीस स्पर्श करू नये. याशिवाय मंदिरात फुले, हार व इतर पूजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे.
पदयात्री पालखी मंडळांनी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये. प्रकृती बरी नसलेल्या साईभक्तांनी दर्शनासाठी येऊ नये. याबरोबरच दर्शन पास वितरण काऊंटरवर होणाऱ्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी साईभक्तांनी ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करून निर्धारीत वेळेतच शिर्डीत दर्शनासाठी यावे, असे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. यासोबतच संस्थानच्या कर्मचाऱ्यांनाही विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.






