नागपूर शहरात लसीकरणाचा नवा विक्रम,मंगळवारी एवढ्या जणांचे लसीकरण  

0
13

नागपूर, ता. ०१ डिसेंबर (प्रतिनिधी)

कोव्हिड विषाणूच्या संसर्गाच्या बचावासाठी लसीकरण हे महत्वाचे अस्त्र आहे.  विशेष म्हणजे नागरिकांमध्येही लसीकरणाबाबत जागृती येत असून नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. याची प्रचिती मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी आली.

मंगळवारी नागपूर शहरात लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला असून या दिवशी मनपा, खाजगी आणि शासकीय केंद्रांवर तब्बल ४२ हजार ४०२ जणांचे लसीकरण झाले आहे. या नवा विक्रमाबद्दल मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूरकरांचे अभिनंदन करीत सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे.

नागपूर शहरात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी १९ लाख ७३ हजार ४०० व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहेत. शहरातील लसीकरणाची गती वाढावी, नागरिकांना त्यांच्या परिसरात लसीकरणाची व्यवस्था व्हावी यासाठी मनपाद्वारे शहरातील विविध ठिकाणी १५०च्या वर लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय ‘हर घर दस्तक’ या विशेष मोहिमेद्वारे घरोघरी जाउन लसीकरण न झालेल्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.

शहरातील १९ लाख ७३ हजार ४०० पात्र लाभार्थ्यांपैकी १९ लाख १६ हजार ६२९ जणांनी पहिला डोज घेतला आहे. म्हणजेच शहरात पहिला डोज घेणा-यांचे प्रमाण हे ९७.१२ टक्के एवढे आहे. तर दुसरा डोज घेण्यासाठीही नागरिक आता पुढे येत आहेत. आतापर्यंत ११ लाख ६३ हजार ६७८ जणांनी दुसरा सुद्घा डोज घेतला असून याचे प्रमाण ५८.९७ टक्के एवढे आहे.

आज स्थितीत शहरात ३० लाख ८० हजार ३०७ एवढे लसीकरणाचे डोज पूर्ण झालेले आहेत. नागपूर शहरातील लसीकरण मोहिमेला मिळणा-या प्रतिसादातून हे नवे विक्रम प्रस्थापित झाले असून नागरिकांनी अशीच जागरूकता कायम ठेवून कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचावासाठी नियमांचे पालन करूनच दैनंदिन व्यवहार करावा, असेही आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

मंगळवारी २९ हजारावर तरुणांनी घेतला पहिला डोज

मंगळवारी लसीकरणाच्या नव्या विक्रमामध्ये आणखी एक भर पडली ती १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची. शहरातील मनपा आणि इतर शासकीय केंद्रांवर मंगळवारी एकाच दिवशी तब्बल २९१७६ तरुणांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोज घेतला. तर दुसरा डोज घेणा-यांची संख्या १३२२५ एवढी आहे.

या वयोगटातील आतापर्यंत १०,५०,६११ नागरिकांनी पहिला डोज तर ५,३९,१२४ नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. कोव्हिडच्या संसर्गापासून स्वत:चा आणि सोबतच इतरांचा बचाव व्हावा यासाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आणि लसीकरण हेच एकमेव माध्यम आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही शंका मनात न ठेवता किंवा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here