नागपूर, ता. 2 नवंबर :(प्रतिनिधि) कोरोना संसर्गाचा धोका कमी असला तरी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. २ ते ६ नोव्हेंबर दरम्यान साजरा होणा-या दिवाळी उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच दिवाळी साजरी करावी, यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी केले आहेत.
दिवाळी उत्सवासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केली असून त्याच्या अंमलबजावणीस्तव मनपाद्वारे आयुक्तांनी आदेश निर्गमित केले आहेत.
त्याअंतर्गत राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनांचे पालन केले जावे. शहरातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असली तरीही नागरिकांनी दीपावली उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहिल याची दक्षता घ्यावी. दीपावली उत्सवानिमित्त कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी घराबाहेर निघणे टाळावे. फटाके आणि आतिषबाजीमुळे वायू आणि ध्वनी प्रदुषणामुळे जनसामान्य आणि प्राणिमात्रांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होउ नये यासाठी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार नियम काहीशे शिथील करण्यात आले असले तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करताना ते शक्यतो ऑनलाईन माध्यमातून करण्यात यावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे, शिबिर आयोजित करण्यात यावेत.
कोरोना, डेंग्यू, मलेरिया व अन्य आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यासंदर्भात जनजागृती करण्यात यावी. मात्र येथेही जास्त नागरिकांनी एकत्र येउ नये याची काळजी घेतली जावी. राज्य शासनाद्वारे जारी सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर नियमानुसार कारवाई करण्याचेही मनपा आयुक्तांनी आदेशामध्ये नमूद केले आहे.






