लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा :जिल्हाधिकारी इटनकर  

0
11

नागपूर दिनांक 13 सप्टेंबर (प्रतिनिधी )

पशुधन ही आपली संपत्ती त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रार्दुभाव रोख्यण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी कार्यान्वयीन यंत्रणांना जारी केले आहे.

प्राण्यांमध्ये संक्रमक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्ह्यातील जनावरांमध्ये लंपी चर्मरोग प्रार्दुभावाची माहिती, पशुपालक, इतर कोणतीही व्यक्ती शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायतीनी त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक आहे.

सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणी मध्ये अडथडा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था यांचेविरुध्द गुन्हा दाखल तसेच कायदेशिर कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखास प्राधिकृत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तूर्तास लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास नसला तरी रोग सदृष्य लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास तात्काळ गाई, बैल, वासरे, म्हैस व पारडे यांना स्वतंत्र ठेवणे, बाधित व निरोगी जनावरे वेगवेगळी बांधणे, नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास माहिती देणे आणि या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यु झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पध्दतीने पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहाय्याने पशुपालकांनी विल्हेवाट लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

त्यासोबतच गोठ्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करुन रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचीड आदीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

लंपी चर्मरोगाचा प्रार्दुभाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमार्फत कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरिक्षण करणे तसेच पशुधनाची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

लंपी रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील कार्यान्वयीन यंत्रणांना कामाचे वाटप करण्यात आले आहे. महसूल विभागाने कार्यान्वयीन यंत्रणांच्या मदतीने रोग नियंत्रण, जनावरांचे बाजार, प्राण्यांच्या जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे व प्राण्यांचे गट करुन कार्यक्रम पार पाडण्यावर प्रतिबंध करावा. पोलीस यंत्रणेने जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जनावरांची वाहनातून होणारी वाहतूक प्रतिंबधीत करुन आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करावी.

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या जनावरांची वाहनातून होणारी वाहतूक प्रतिबंधित करावी. ग्राम विकास विभागाने आजाराबाबत गावामध्ये जागृती करुन सतर्कता बाळगणे, गावामध्ये या आजाराबाबत माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षास कळविणे, गोठ्यामध्ये किटक नाशकांची फवारणी करणे, मृत जनावरांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी. भूमी अभिलेख विभागाने रोग प्रार्दुभाव झाल्यास एपी सेंटर पासून पाच किलोमीटरच्या अंतरावरील गावांचा नकाशा तयार करावा.

पशुसंवर्धन विभागाने लंपीरोग किंवा रोगसदृष्य लक्षणांनी बाधित जनावरे आढळल्यास योग्य ते उपचार करुन नमूने गोळा करावे. तात्काळ प्रयोग शाळेत पाठविणे, आजारी प्राण्यांचा दैनंदिन रोगाविषयी माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षास कळवावे. गोठ्यामध्ये किटकनाशक फवारणी तसेच मृत जनावरांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी.

जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्थेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत भरविण्यात येणाऱ्या प्राण्यांचे खरेदी-विक्री बाजार बंद ठेववावेत व जनावरे खरेदी विक्रीसाठी जमाव ठेवू नये, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here