नागपूर/ महाराष्ट्र दिनांक 3 सप्टेंबर ( प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकुटुंब भेट घेतली. प्रदेशाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी पहिलीच भेट होती.
नौदलाच्या ध्वजामध्ये परिवर्तन करून महाराष्ट्राचा गौरव वाढविल्याबद्दल बावनकुळे यांनी यावेळी पंतप्रधानाचे आभार मानले. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे प्रतिक असलेल्या शिवमुद्रेचे रूप नौदलाच्या प्रतीक चिन्हाला प्रदान करण्यात आले आहे याचा आवर्जून उल्लेख बावनकुळे यांनी या भेटीत केला.
बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील पक्ष बळकटीसाठी करीत असलेल्या कामांची माहिती दिली. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार दमदारपणे जनकल्याणाचे काम करीत असून केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणासह राज्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते देखील हातभार लावत असल्याचा माहिती बावनकुळे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षकार्यासाठी मार्गदर्शन केले. शेतकरी, गरीब व दुर्बल घटकातील नागरिक व कुटुंबाच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करावेत अशी सूचना केली.
–श्री गणेश प्रतिमेची सस्नेह भेट
महाराष्ट्रात गणेशोत्सवात साजरा होत असताना या पंतप्रधान मोदी यांची सहकुटुंब भेट घेण्याचा योग जुळून आल्याने बावनकुळे कुटुंबीयांनी गणेशाची मूर्ती पंतप्रधानांना भेट दिली. यावेळी बावनकुळे यांच्या पत्नी सौ.ज्योती, मुलगी पायल आष्टणकर व नातू अधिराज आष्टणकर, चिरंजीव संकेत, सुन अनुष्का त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कुटुंबासह कुशलक्षेम विचारणा केली. नातू अधिराज सोबतदेखील त्यांनी गप्पा देखील केल्या.






