खरी शिवसेना कोणाची?सर्वोच्च न्यायालयात आज काय होणार? 

0
15

महाराष्ट्र दिनांक 22 ऑगस्ट ( प्रतिनिधी)

शिवसेनेच्या १६ आमदारांची अपात्रता; तसेच खरी शिवसेना कोणाची यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर जून महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याआधी १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी न्यायालयाने दहा दिवस लांबणीवर टाकली होती. त्यानुसार, आज, २२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी होण्याची शक्यता आहे; मात्र आजची सुनावणीदेखील लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी एकनाथ शिंदे गट, शिवसेना आणि भाजपची धाकधूक वाढणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांनी दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे गेल्या ११ जुलैपासून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा विचार न्या. रमणा यांनी व्यक्त केला आहे; मात्र अजून घटनापीठाची स्थापना झालेली नाही.

विद्यमान सरन्यायाधीश रमणा यांच्या विचारानुसार, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय आज, सोमवारी खंडपीठाकडून जाहीर केला जाऊ शकतो, तर सरन्यायाधीश रमणा निवृत्तीपूर्वी या प्रकरणी आज, सोमवारी सुनावणी घेऊन महत्त्वपूर्ण निकाल जाहीर करतील अशी शक्यतादेखील वर्तवली जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट, शिवसेना तसेच भाजप यांच्यासह सर्वांचेच लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यापासून त्यावरील सुनावणी वारंवार लांबणीवर टाकली जात आहे. यामुळे शिवसेनेसह बंडखोर आमदारांची धाकधूक वाढत चालली आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर याआधी ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती; मात्र त्या दिवशी ती लांबणीवर पडली.

या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी न्यायमूर्तींचे पीठ स्थापन करण्यास वेळ लागेल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्या दिवशी स्पष्ट केले; मात्र विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदारांविरुद्धची अपात्रतेची कारवाई स्थगित करावी, असे निर्देश सरन्यायाधीशांनी तेव्हा दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here